Sunday, 30 October 2016

जुने ते सोने - Deepawali Old Is Gold Seva - Khamgaon (near Yavat, Pune Solapur Road)


विठोबाचे राज्य आम्हा
नित्य दिपवाळी

खरंच आपल्या जीवनात प.पु. सद्गुरु बापू आले आणि नित्य दिवाळीचा अनुभव आपण घेत आहोत.
आज लक्ष्मीपूजन! दिवाळीतील एक आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस! आज बापू कृपेने आणि बापू इच्छेने हडपसर केंद्रातील आम्ही 5 श्रद्धावान *जुने ते सोने* अंतर्गत सेवेसाठी सर्वे करण्यासाठी यवत जवळील खामगाव फाटा ( सोलापूर रोड वर) गेलो होतो. ह्या भागात ऊसाचे गुऱ्हाळ (गुळ तयार करण्याचे ठिकाण) बरेच आहेत. तेथे ऊस तोड कामगाराच्या बऱ्याच वस्त्या ह्या भागात आहेत.
आम्ही 3 ठिकाणी सर्वे केला. आज दिवाळीचा सण साजरा करत आहोत पण त्याठिकाणी आम्हाला दिवाळी कुठल्याही स्वरूपात दिसली नाही. बरीच मंडळी सण असूनही कामाला गेली होती. स्त्रिया, लहान मुले आणि काही पुरुष मंडळींना आम्ही भेटलो..बऱ्याच लहान मुलांच्या अंगावर कपडे नव्हते..ताडपत्री आणि प्लास्टिक ने बनवलेल्या तात्पुरत्या झोपडी मध्ये हि सर्व मंडळी राहते .
दिवाळीमध्ये आपण सुगंधी तेल, उटणे लावून अभ्यंग स्नान करत असतो. पण ह्या मंडळींना साधं तेल सुद्धा नशिबी नाहीय..
चर्चा करताना त्यातील एक व्यक्ती आम्हाला त्यांच्या गरिबीविषयी सांगत होता. तर त्याच्या शेजारी असलेला व्यक्ती त्याला सांगत होता की त्याना समजले आहे सगळं..आणि थांबवत होता..मला त्याच्याकडे स्वाभिमान दिसला.. खरंच वाटले की ही कष्ट करणारी मंडळी स्वतःचे दारिद्र्य सांगून कुणाला भीक मागत नाहीत.
हि मंडळी धुळे जिल्ह्यातून इकडे ऊसतोड करण्यासाठी येतात..अशिक्षित,एका घरात 4-5 मुले, मुलांना शाळा नाही कारण सतत फिरत राहतात.
परत येताना आम्ही चर्चा करत होतो की , आजकाल दिवाळीचा फराळाचे पदार्थ *"काय - काय"*खाऊ असा प्रश्न आपल्याला पडत असतो. पण ह्यांना *"काय"* खाऊ असा प्रश्न पडलेला आहे.
कपड्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला सर्वाना प्रश्न पडतो की आज कुठला ड्रेस घालू ? आज कुठली साडी नेसु? आपल्याला भरपूर पर्याय असतात. पण खरंच सांगतो ह्या लोकांकडे हा प्रश्नच नाहीय कारण त्यांच्याकडे *पर्यायच* नाहीत..
आपल्याला परम पूज्य सद्गुरू बापूंनि जुने ते सोने सेवे अंतर्गत एक सुवर्णसंधी दिलेली आहे. तरी सर्व श्रद्धावान मित्रांनी आपल्याकडील कपडे ( स्वच्छ, इस्त्री केलेले) , जुनी भांडी, मुलांची जुनी चांगली खेळणी ह्या शनीवारी केंद्रावर आणून द्यावीत आणि खऱ्या अर्थाने ह्या उपेक्षित लोकांच्या जीवनात दिवाळी आणून आपली दिवाळी साजरी करूया.
अंबज्ञ प्रवीणसिंह हलकीकर.
जय जगदंब , जय दुर्गे!!!

No comments:

Post a Comment